आदरणीय नंदकुमार सरांच्या कार्यशाळेबाबत मनोगत
आदरणीय नंदकुमार सर,
आपली कार्यशाळा प्रत्यक्ष पाहण्याची, ऐकण्याची व अनुभवण्याची संधी मिळाली हे माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाचे भाग्यच..!
एक शिक्षक या नात्याने भूमिका पार पाडत असताना मनापासून काम करत आहे पण आनंद मिळत नाही अशी अवस्था झाली होती. काहीतरी उणीव आहे पण नेमकं काय राहून जातयं कळत नव्हतं. उज्ज्वल भविष्यासाठी ज्यांच्या स्वप्नांना बळ द्यावं, त्या चिमुकल्यांच्या मनात गणिताच्या माध्यमातून भूमिती - बीजगणिताचे नव्हे तर भितीचे बीजारोपण आपण करतोय. भिती असताना आनंद कसा वाटेल? आपण नकळत माझा शोध पूर्ण केलात, खरंच मनापासून आभार...
यावेळी आमच्याशी सुसंवाद साधत आपण अगदी सहज बोलून गेलात, "मला हवी असलेली गोष्ट पूर्णपणे मिळाली नाही तर मी सुखी नाही. वर्गातील 100 टक्के विद्यार्थी लिहायला-वाचयला शिकतील तेव्हा तो शिक्षक सुखी होईल. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी शिकतील तेव्हा मी सुखी होईल." हे मार्मिक विधान मनावर बिंबवलं गेलं. आपल्या संवादाने विचारांना जणू नवी दिशाच मिळाली. "नियोजन करावं पहिल्या क्रमांकावर येण्याचं. पहिल्या तीनमध्ये येऊ असं नियोजन कसं करता येईल?" खरंच, आपण आमचे मोठे गुरूजी आहात. गुणाकार आला म्हणजे भागाकार येतो असंच आजपर्यंत मी मानत आलो. "स्थानिक किंमत कळल्याशिवाय भागाकार येणार नाही", हे आपण मोजक्या शब्दांत पटवून दिलंत.
आज शिक्षक म्हणून वावरण्याची नवी दृष्टी आपण दिलीत. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकावं म्हणून शिकवायचं नाही तर तो त्यांचा हक्क आहे आणि तो मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे, हा दृष्टिकोन आपण दिलात.
SMART प्रशिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात. केवळ प्रशिक्षणच नव्हे तर सर्व शिक्षकही SMART होऊन, HARD WORK नाही तर SMART WORK करून आपल्या स्वप्नातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवतील याचा मला विश्वास वाटतो.
आपले मनःपूर्वक आभार..!
आपला विनम्र,
चंकीकुमार शहाणे
एक प्राथमिक शिक्षक
हिंगोली
Comments
Post a Comment